Hundred-Yearafter

शंभर वर्षानंतर…

बरोबर शंभर वर्षापूर्वी म्हणजे 1918-19 साली स्पॅनिश फ्लू या नावाच्या तापाने धुमाकूळ घातला होता. त्यावेळी केवळ भारतातच 1.8 कोटी लोक या रोगाला बळी पडले होते. बळी जाणाऱ्याची ही संख्या तत्कालीन लोकसंख्येच्या सहा टक्के एवढी होती. आता बरोबर शंभर वर्षांनी तशाच एका मोठ्या संसर्ग रोगाचा जग सामना करीत आहे.

शंभर वर्षापूर्वी संशोधन आजच्या सारखे प्रगत नव्हते. त्यामुळे स्पॅनिश फ्लूचे बळी मोठ्या संख्येने गेले होते. आज मात्र विविध रोगांवर आपण लस शोधून मानवजातीचे कल्याण करण्यात शास्त्रज्ञ यशस्वी झाले असले तरी नव्याने काही रोग निर्माण होतात व आपल्यापुढे त्याचे एक आव्हान उभे राहाते. गेल्या दशकात आपण सार्स, इबोला या रोगांवर औषध शोधून आव्हाने पेलली.

आता जगापुढे कोरोनाचे चॅलेंज उभे ठाकले आहे. आजवर 170 हून जास्त देशात कोरोना फैलावला असून आजवर वीस हजाराच्या घरात माणसे मेली आहेत. आपल्याकडे भारतात तरी याचा प्रसार जगाच्या तुलनेत उशीरा झाला असला तरी जागाने गेल्या तीन महिन्यात घेतलेल्या अनुभवातून आपण शहाणे होऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या रविवारी संपूर्ण देशात जनता कर्प्य़ु जारी करण्याचा आदेश दिला होता.

जनतेने या आवाहनाला शंभर टक्के प्रतिसाद दिला होता. अर्थात एक दिवस शुकशुकाट पाळून कोरोनातून काही मुक्तता मिळणार नव्हती. या जनता कर्प्यु नंतर काही लोक निर्धास्त झाले होते. परंतु आता खरीच कसोटी सुरु झाली आहे, हे ओळखून पंतप्रधानांनी मंगळवारी रात्री 21 दिवस संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्याची घोषणा केली आहे.

या देशातील प्रत्येक नागरिकाने स्वतच्या, आपल्या जवळच्या नातेवाईकांच्या, मित्रांच्या व जनतेच्या सुरक्षिततेसाठी हा लॉकडाऊन शंभर टक्के पाळण्याची गरज निर्माण झाली आहे. पंतप्रधानांनी ज्या कळकळीने आवाहन जनतेला केले आहे त्याचा मतितार्थ जनतेने ओळखला पाहिजे. अगदी अत्यावश्यक कामांसाठी किंवा जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठीच घरातून बाहेर पडले पाहिजे.

आज देशाच्या इतिहासात दोन दिवस कोणतेही वृत्तपत्र प्रकाशित न होण्याची ही पहिलीच वेळ आहे. अगदी युद्दाच्या काळातही आपल्याकडे वृत्तपत्रे प्रकाशित होत होती. त्यामुळे आता युध्दापेक्षाही भयानक परिस्थिती आहे. यावून जनतेने सध्याच्या परिस्थीचे गांभीर्य लक्षात घेतले पाहिजे. आज केवळ आपला देश नव्हे तर जग संकटात आहे.

सध्याच्या जागतिकीकरणाच्या युगात आपण जगापासून अलिप्त राहू शकत नाही. जगात आपण व्यापार, उदीम करुन आपली भरभराट करतो, तसेच नवीन तंत्रज्ञान आपल्याला जगापासून मिळते. किंवा आपण आपले तंत्रज्ञान अन्य देशांना देतो. जागतिकीकरणाच्या या जशा जमेच्या बाजू आहेत तशा काही नकारात्मक बाबीही आहेत. यातील महत्वाची बाब म्हणजे संसर्गजन्य रोग.

चीनमधील हुवान शहरात सुरु झालेला हा कोरोना आता जगात पोहोचला आहे. यावर एवढ्या लवकर लस किंवा औषध निघणे कठीण आहे. मात्र या रोगातून लाखो लोक बरेही झाले आहेत हे वास्तव आहे. मात्र त्यांनी तसे उपचार करुन घेताना स्वतला विलीगीकरणात ठेवले आहे. विलीगीकरणात जनता राहिल्यामुळे या रोगाच्या प्रसाराची चेन तोडणे शक्य होते.

पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे पहिल्या एक लाख लोकांना कोरोनाची लागण होण्यासाठी 67 दिवस लागले. तर त्यानंतरच्या एक लाख लोकांना केवळ 11 दिवसात लागण झाली. मात्र त्यानंतर एक लाख लोकांना केवळ चार दिवसात ही लागण झाली. त्यामुळे कोरोना किती झपाट्याने पसरतो याचे हे उत्तम उदाहरण आहे.

आपल्याकडे मुंबईसारख्या भरपूर लोकसंख्या असलेल्या महानगरात या रोगाचा प्रसार झपाट्याने होऊ शकतो. त्याचबरोबर देशातील अनेक महानगरात झोपडपट्ट्यातून लाखो लोक राहातात त्यात याचा झपाट्याने प्रसार होण्याचा धोका आहे. हे सर्व टाळायचे असेल तर सध्या 21 दिवसांचा व गरज पडल्यास पुढेही काही काळ घरात शांततेत बसण्याशिवाय काही पर्याय नाही.

इटलीसारख्या प्रगत देशात हा रोग झपाट्याने पसरण्याची काही खास कारणे आहेत. इटली हा पर्यटकांचे आकर्षण असलेला देश आहे. त्यामुळे येथे जगातून पर्यटक येतात. त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांमुळे हा रोग पसरण्यास मदत झाली. तसेच इटलीचे नागरिकही जगभर फिरत असतात, त्यामुळे त्यांनीही या रोगाचा प्रसार केला. तसेच एकत्रित कुटुंबपध्दती, नात्यातील जपणूक, सहभोजन याला इटलीत फार महत्व दिले जाते.

मिलान शहरात कामासाठी आजूबाजूच्या अनेक गावातून लोक येत असतात. त्यांच्यामुळे हा रोग ग्रामीण भागात पसरण्यास मदत झाली. त्याचबरोबर इटलीच्या लोकसंख्येत ज्येष्ठ नागरिकांची मोठी संख्या आहे. या रोगाचा धोका दहा वर्षाखालील मुले व ज्येष्ठ नागरिक यांना जास्त असतो. कारण या दोघांचीही या संसर्गास प्रतिकार करण्याची क्षमता कमी झालेली असते.

तसेच इटलीतील नागरिकांनी या रोगाला सुरुवातील फारसे महत्व दिले नाही. त्यामुळे इटलीत आज सर्वाधिक या रोगाचे बळी ठरले आहेत. आज इटलीची रोग फैलावण्याची कारणे पाहता, आपल्याशी साधर्म्य आहे. त्यामुळे आपल्याला जर इटलीसारखी स्थिती ओढावून घ्यायची नसेल तर आपल्याला खबरदारी घेणे गरजेचे आहे. यासाठी आपण शंभर टक्के लॉकडाऊन पाळण्याची गरज आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत