अर्णब, जनतेला माहिती द्या!

रिपब्लक टी.व्ही.च्या स्टुडिओत बसून कोणालाही देशद्रोही ठरविणारे किंवा देशप्रेमाची सर्टिफिकीटे वाटणारे पत्रकार तसेच अन्वय नाईक या इंडिरिअर ढिझायनरला आत्महत्या करण्यास भाग पाडण्याचा आरोप असलेले अर्णब गोस्वामी यांचे सत्ताधाऱ्यांशी म्हणजेच केंद्रातील भाजपा सरकारशी कसे लागेबांधे  आहेत ते आता हळूहळू उघड होत आहे. देशाच्या सुरक्षिततेशी संबंधीत माहिती अगोदरच त्यांना उपलब्ध होती असे आता उघड झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. खरे तर ही माहिती त्यांना अर्थातच भाजपाच्या उच्चपदस्थ गोटातून किंवा थेट पंतप्रधानांच्या कार्यालयातून मिळाली असणार हे उघड आहे. अर्थातच यामागे २०१९ च्या निवडणुका जिंकण्याचा कट होता. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करुन जबाबदार व्यक्तींना शिक्षा झाली पाहिजे. कारण देशाच्या संरक्षणासंबंधी अशा प्रकारे खेळ करणाऱ्या व्यक्तींना ढिले सोडणे म्हणजे देशद्रोह करण्याचाच प्रकार आहे. पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या बालाकोटवर हवाई हल्ल्याची माहिती अगोदरच असणाऱ्या अर्णब गोस्वामी यांच्यासंबंधी भाजपाने अजून तरी मौन बाळगले आहे. कोणत्याही घटनेवर सर्वात प्रथम प्रतिक्रीया देणारे भाजपाचे प्रसिध्दी वीर यावर काही बोलावयास तयार नाहीत. त्यामुळे यामागे काही निश्चितच गौडबंगाल आहे असे समजण्यास भरपूर जागा आहे. दोन वर्षापूर्वी २६ फेब्रुवारी २०१९ रोजी बालाकोटवरील हल्ल्याची माहिती अर्णब गोस्वामी यांनी सध्या अटकेत असलेले पार्थो दासगुप्ता यांना २३ फेब्रुवारी रोजी दिली होती. दासगुप्ता यांचे व्हॉटसअप चॅट पोलिसांनी तपासले असता हे सर्व उघड झाले आहे. भारताच्या हवाई दलाकडून बालाकोटवर हल्ला करण्याची योजना गुप्त होती. परंतु ही माहिती गोस्वामी यांच्या पर्यंत कशी पोहोचली व कोणी पोहोचवली, हे सर्व शोधावे लागणार आहे. ही माहिती पोहोचविणाऱ्या सर्व व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करणे गरजेचे आहे. जनतेला खरे काय आहे ते समजले पाहिजे. अर्णब यांनी लिहलेल्या व्हटसअप संदेशात म्हटले होते की, पुलवामाचा हल्ला आमच्यासाठी खूपच उपयुक्त आहे. या हल्ल्यात ४० जण मृत्यूमुखी पडले. आता आम्ही निवडणूक जिंकू, असे म्हटले आहे. या प्रतिक्रियेतून अर्णब यांची मानसिकता समजते व तीच मानसिकता पंतप्रधानांची आहे असे कॉँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी व्यक्त केलेली शंका योग्यच आहे. अशा प्रकारचा हल्ला केला जाणार ही संवेदनाक्षम माहिती पंतप्रधान, संरक्षणमंत्री, गृहमंत्री, लष्करप्रमुख, वायुदलप्रमुख अशा काही निवडक मोजक्याच पाच लोकांना असते. या पाचापैकी कोणी माहिती अर्णब यांना पोहोचवली, हे उघड होणे आवश्यक आहे. अशी माहिती पत्रकाराला पुरविणे हा गुन्हा आहे. ही माहिती यातून जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची शक्यता होती. त्यातून नुकसान वायूदलाचेच झाले असते. शेवटी त्याचा फटका देशाला पोहोचला असता. जे लोक आपल्याला मोठे देशभक्त म्हणवून घेतात व दुसऱ्याना राष्ट्रभक्तीची सर्टिफिकिटे वाटतात त्यांनी वायुदलाला संकटात टाकणे ही राष्ट्रभक्ती नाही. अर्णब गोस्वामी ही माहिती व्हॉटसअपवर टाकतात. अशा स्थितीत ही माहिती पाकिस्तानपर्यंत पोहोचणे फारसे काही अवघड नाही. त्यादृष्टीने पाहता ही देशाच्या हिताच्या दृष्टीने फार महत्वाची गंभीर बाब होती. त्यामुळे ही माहिती पुरविणारा व ही माहिती अन्यत्र पाठविणाऱ्यास शिक्षा ही करावीच लागणार आहे. कारण यातच देशहीत आहे. एवढ्या महत्वाच्या सरंक्षणासंबंधी प्रश्नाबाबत सरकारने आपली भूमिका स्पष्ट करु नये याचे देखील आश्चर्य वाटते. अर्णब गोस्वामी हे भाजपाच्या गोटातील आहेत, हे काही छुपे राहिलेले नाही. आपण भाजपाचे समर्थक नाही असे बाहेरुन भासवत त्यांनी नेहमीच भाजपाचेच समर्थन केले आहे. अर्थात त्यांनी कोणत्या विचाराचे असावे हा त्यांचा प्रश्न आहे परंतु आपण निपक्षपाती आहोत असे दाखविणे चुकीचे आहे. यातून ते त्यांचे चॅनेल पाहाणाऱ्यांची ते दिशाभूल करीत असतात. भाजपाचा त्यांनी खुलेपणाने जरुर प्रचार करावा, त्यामागे त्यांचे काही आर्थिक लाभ असतीलही, परंतु त्यांनी आपल्या वैचारिक भूमिकेत पारदर्शकता ठेवावी अशी अपेक्षा आहे. देशातील जनतेचेही आश्चर्य वाटते. खरे तर हे सर्व चॅटिंग उघड झाल्यावर राष्ट्रप्रेमाचे भरते येणारे नेते व जनताही याविषयी काही बोलत नाही. अर्णब गोस्वामी यांचे चॅटिंग वाचूनही देशातील नागरिक ‘फसवणूकी’च्या आणि राष्ट्रद्रोह्यां विरोधी ‘भावने’ने पेटून ऊठत नाहीत,  त्यांना दिल्लीपतीला ‘जाब’ विचारावासा वाटत नाही. यातच  राष्ट्र आणि बेगडी राष्ट्रप्रेमाचा  सपशेल पराभव असून देशातील सर्वसामान्य  नागरिकांचा ‘संवेदना’ कशा बोथट झाल्या आहेत याचा भक्कम पुरावा आहे. राजकिय पक्ष किंवा राजकीय पक्ष कार्यकर्ते याशिवाय  पक्षीय राजकारणा पल्याड  नफा नुकसानीचा विचार ही शिवू न देणारा परंतू देशावर, देशाच्या सैनिकांवर उत्कट, निर्वाज्य प्रेम करणा-या नागरिकांनाही यात काहीही वावगे, चुकीचे वाटू नये हाच आणि असा बेसुध समाज निर्माण करण्यात देशाचे सध्याचे सरकार यशस्वी झाले आहेत हे नक्की. आणि भारताचा, हिंदूस्थानचा सपशेल पराभव यात झाला आहे. अर्णब अशा प्रकारे आपल्या स्टुडिओत बसून देशवासियांना देशप्रेमाचे ज्ञान पाजळत असतात, तर दुसरीकडे देशविघातक कृत्य करीत असतात. अर्थात हे अजाणतेपणाने केले जाते असे म्हणणे चुकीचे ठरेल. अर्णब ज्या स्टाईलमध्ये, ज्या उग्रतेने चर्चासत्रात भांडत असतात ते पाहता त्यांना ज्ञान पाजळेल कोण असा सवाल आहे. परंतु आता त्यांना कायद्याचा बडगा दाखविण्याची नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत