व्हॉट्सअपची धमकी आणि आपण!

गेल्या दशकात अस्तित्व नसलेल्या व आता प्रत्येकाचा जीवश्यकंठश्य मित्र झालेल्या व्हॉट्सअपने आपली नियमावली जाहीर करुन थेट गोड भाषेत धमकीच आपल्या ग्राहकांना दिली आहे. आम्ही सांगतो ते मान्य करा अन्यथा अकाऊंड डिलीट करु अशी थेट धमकीच देण्यात आली आहे. यासंबंधीच्या पानभर जाहिराती व्हॉट्सअपने वृत्तपत्रांमध्ये प्रसिध्द केल्या आहेत. अनेकांच्या मनात याविषयी गोंधळ निर्माण झाला आहे. व्हॉट्सअपने हे काय मांडून ठेवले आहे? ते योग्य की अयोग्य? यात नेमकी वापरकर्त्यांनी कोणती भूमिका घ्यावी? जर हे खाते डिलीट झालेच तर पुढील काळात अन्य कोणता पर्याय आहे का? असे अनेक सवाल सर्व ग्राहकांना सतावत आहेत. तसेच या प्रायव्हसी पॉलिसीमुळे आपला डेटा आता सुरक्षित असेल का अशी वापरकर्त्यांना चिंता वाटते आहे. कित्येकांनी व्हॉट्सअपला कायमचा राम राम ठोकून टेलिग्राम किंवा सिग्नल वर शिफ्ट होण्याची तयारी केली आहे. एकूणच सध्या अनेकांच्या डोक्यात गोंधळाची स्थिती आहे. सध्या जाहीक केलेली व्हॉट्सअपची नवीन पॉलिसी नेमकी आहे तरी काय ते पाहू. आतापर्यंत आम्ही तुमचा डेटा सुरक्षित ठेवतो असा दावा करणाऱ्या व्हॉट्सअपने नवीन प्रायव्हसी पॉलिसीनुसार वापरकर्त्यांचा डेटा फेसबुक आणि इन्स्टाग्रामसोबत शेअर करण्याचे ठरवले आहे. फेसबुक व इन्टाग्राम या त्यांच्याच मालकीच्या कंपन्या असल्या तरीही डेटा त्यांना शेअर करण्याची भूमिका योग्य आहे की अयोग्य असा सवाल आहे. हा डेटा कोणता आहे? तर आपले नाव, आपला नंबर, आपला डीपी, लोकेशन,  आपले आर्थिक व्यवहार, एकमेकांना दिलेले पत्ते, शेअर केलेले व्हिडीओ, कॉन्टॅक्टस, आपली राजकीय मते, ज्या ग्रुपमध्ये आहोत त्या ग्रुपची माहिती, त्या ग्रुपची मानसिकता, आपला आयपी एड्रेस… इत्यादी सगळेच. ही सर्व माहिती म्हणजे आपल्याकडील सर्व गोपनीय बाबी या अन्य कंपन्यांना खुल्या होणार आहेत.

फेसबुकने इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअप विकत घेऊन या तिन्ही कंपन्यांना एकाच छताखाली आणले आहे. या तिन्हीवरचा डेटा जमा करण्यासाठी डेटा सेंटर्स उभारली आहेत. या डेटाचा उपयोग टार्गेटेड ऍडव्हरटाइजिंग आणि पॉलिटिकल कॅम्पेनसाठी केला जाईल. उदाहरणार्थ, तुम्ही व्हॉट्सअपवर कुणासोबत मोबाईल फोनविषयी चर्चा कराल तर तुम्हाला फेसबुक मोबाईल फोनच्या जाहिराती दाखवायला सुरुवात करेल. व्हॉट्सअपने नुकतेच स्वतःचे व्हॉट्सअप पेमेंट लाँच केले आहे. त्यावर होणाऱ्या व्यवहारावर सुद्धा बारीक नजर असेल. जर तुम्ही एखाद्या पक्षाचे समर्थक असाल तर तुम्ही कोणत्या पक्षाचे समर्थक आहात ते समजले व त्यानुसार तुमचे मतपरिवर्तन करण्यासाठी प्रचार केला जाईल. निवडणुकीच्या प्रचारात तुम्हाला टारगेट करून प्रचार केला जाईल. अधिक विस्ताराने सांगायचं तर समजा मी अ पक्षाचा समर्थक आहे आणि माझ्या मतदारसंघातील अ पक्षाचा उमेदवार सोशल मीडियावर स्पॉन्सर्ड कॅम्पेन करत असेल तर फेसबुक त्याची जाहिरात आधी मला दाखवेल. मी त्याला सकारात्मक प्रतिसाद देईन. या माझ्यासारख्या अनेकांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे उमेदवाराची कॅम्पेन सफल होईल आणि फेसबुकलाही पैसा मिळेल. काही वेळा हे उलट पण होऊ शकते. आपली राजकीय मते बदलण्यासाठी विरुद्ध बाजूच्या उमेदवाराच्या जाहिरातीचा भडिमार आपल्यावर केला जाऊ शकतो. जो पक्ष जास्त पैसा देईल, फेसबुक त्याची जाहीरात करेल. इथेपर्यंत ठीक आहे, पण हा डेटा जर फेसबुक तिसऱ्याच कंपनीला विकत असेल तर ते जास्त भयानक असेल. सर्वात धोकादायक म्हणजे या सर्वांचे तुम्ही बळी ठरणार आहात. व्हॉट्सअपचा डेटा सध्या फक्त मालक कंपनी असणाऱ्या फेसबुककडेच जाणार आहे.

याला पर्याय म्हणून व्हॉट्सअपच्या एवजी टेलिग्रामकडे पाहिले जाते. परंतु टेलिग्राम हे ओपन सोर्स ऍप असल्याने यावरचा डेटा कुठेही जाऊ शकतो. त्याचा कुणीही गैरवापर करू शकतो. टेलिग्राम ही मुळात रशियन कंपनी होती. तिने आपले बस्तान नंतर बर्लिनला हलवले, नंतर व्हाया इंग्लंड ती आता दुबईला स्थित आहे. टेलिग्रामचे सर्व्हर्स सध्या दुबईमध्ये आहेत. आणखी एक पर्याय सिग्नल या ऍपचा सांगितला जातो. या ऍपची निर्मिती ऍक्टन नावाच्या व्यक्तीने केली आहे. हा ऍक्टन म्हणजे व्हॉट्सअपचा सहसंस्थापक. फेसबुकने व्हॉट्सअप विकत घेतले तेव्हा हा राजीनामा देऊन बाहेर पडला होता. सिग्नल हे ऍप तुलनेने अत्यंत नवखे असल्याने त्यांच्या पॉलिसी कश्या असतील ते आज सांगता येणार नाही. थोडक्यात, व्हॉट्सअप सोडून दुसरीकडे जाणे म्हणजे आगीतून फुफाट्यात जाण्यासारखे आहे. एक महत्वाचा मुद्दा आपण विसरता कामा नये तो म्हणजे, आपले सध्याच्या युगात प्रायव्हेट असे काहीही राहिलेले नाही. तुम्ही ज्या ज्या साईटवर जाता तिथे तिथे तुमचा डेटा गोळा केला जातो. तुम्ही जे जे ऍप वापरता तिथेही तुमचा डेटा गोळा केला जातो. जस्ट डायल,  इंडियामार्ट यासारख्या साईटवर रजिस्टर करताय? त्यावर रजिस्टर केलेल्या प्रत्येकाचा डेटा मार्केट मध्ये उपलब्ध आहे. नौकरी डॉट कॉम वर रिझ्युम अपलोड करताय? त्या प्रत्येक उमेदवाराचा डेटा मार्केटमध्ये उपलब्ध आहे. ट्रु कॉलर वापरत असाल तर तुमच्या नंबरसकट तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधल्या प्रत्येकाचा नंबरचा डेटा मार्केटमध्ये उपलब्ध आहे. हे सगळे लपून डेटा गोळा करतात आणि विकतात. फरक एवढाच की, व्हॉट्सअप हे राजरोसपणे सांगून करत आहे. शक्यतो आपली अत्यंत वैयक्तिक माहिती व्हॉट्सअप चॅट मध्ये देणे टाळावे हाच सध्या तरी एकमेव उपाय. जर फारच भीती वाटत असेल तर इंटरनेटचा वापर पूर्णपणे बंद करणे हा शेवटचा पर्याय. परंतु सध्याच्या काळात आपले एक मिनिट व्हॉट्सअप शिवाय जाऊ शकत नाही. त्यामुळे व्हॉटसअपला शरण जाण्याशियाव अन्य पर्याय नाही, असेच सध्याचे चित्र आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत