World Bend Down

दुनिया झुकती है…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत देशातील लोकांनी मोठ्या प्रमाणात रात्री 9 वाजता लाईट बंद करुन 9 मिनिटे मेणबत्या, मोबाईलचे लाईट, पणत्या किंवा टॉर्च लावून एकतेचे प्रतिक दर्शविले आणि सध्याच्या लॉकडाऊनच्या काळातील आणखी एक महासोहळा पार पडला. दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए… हे नरेंद्रभाई मोदी साहेबांनी पुन्हा एकदा दाखवून दिले.

सध्याचे जग हे इव्हेन्टसचे किंवा सोहळा करण्याचे आहेत मग कोरोनासारख्या महामारीच्या संकटाच्या काळाचीही संधी का सोडावी असे मोदींसारखे इव्हेंट मॅनेजर विचार करणारच. त्याला अनुसरुनच लाईट बंद करण्याचा महासोहळा झाला. यापूर्वी असाच 12 तासाचा जनता कर्फ्यु पाळून 22 मार्च रोजी एक महासोहळा पार पडला होता.

आता पुढे आणखी किती अशाच प्रकारे महासोहळे येतील हे आत्ताच सांगता येत नाही. कारण त्याची आधी कल्पना दिली तर त्याचे महत्व राहात नाही असा महासोहळ्याच्या आयोजकांचा पहिला महत्वाचा नियम आहे. नंतर लॉकडाऊन संपल्यावर केंद्र सरकारला त्याचे क्रेडिट घेण्यासाठी आणखी एखादा महासोहळा करावाच लागेल. त्यातून मोदींची प्रतिमा उजाळण्याचा प्रयत्न केला जाईल.

सध्या सर्व आरोग्यविषयक कार्य राज्य सरकारे करीत आहेत, असे असतानाही परवाच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये मोदीजींची बॉडी लॅग्वेज ही राज्याचे मुख्यमंत्री आपले नोकरच आहेत, अशा थाटातली होती. आता कुणीही विचारेल, मोदींनी घेतलेल्या या महासोहळ्याने नुकसान तर नाही ना? मोदींना जर देश अंधकारातून प्रकाशाकडे न्यायचाच आहे तर मग तुमचा विरोध कशाला? खरे तर आमच्या सांगण्यानुसार, देश अशा प्रकारे प्रकाशाकडे जाणार नाही.

प्रत्यक्ष काम करुनच, म्हणजे आज देशापुढे जे प्रश्न आहेत त्याची सोडवणूक करुनच देश प्रकाशाकडे नेता येणार आहे. मोदी भक्तांना तर गेल्या तीन दिवसांपासून हा इव्हेन्ट जाहीर झाल्यापासून उर भरुनच आले होते. नऊ आकड्याची महती सर्वत्र फिरत होती.

नऊचा आकडा देशाला कसा लाभदायक आहे इथपासून ते या मेणबत्तीच्या उजेडातून किती किलो वॅट प्रकाश निर्माण होईल आणि त्यातून कोरोना कसा नष्ट होईल हे सर्व सोशल मिडियावर हॅमर होत होते. यातून सूर एकच होता, मोदी किती महान आहेत आणि त्यांनी देशाच्या हिताचा कसा विचार केला आहे. यात विज्ञानवादी दृष्टीकोन तर अजिबात नाही. परंतु यातून लोकांची दिशाभूल व्हॉटस् अँप विद्यापीठ करीत आहे.

आपल्याकडे मोदी भक्तांची मांदीयाळी सध्या एवढी झाली आहे की, मागच्या वेळी मोदींनी टाळ्या वाजवायला सांगितले तर लोकांनी थाळ्या पिटल्या, नाच केले. आता मेणबत्ता लावायला सांगितल्याने बहुदा मशाल पेटवतील. सर्वात मजा म्हणजे, मोदी आपण त्या गावचेच नाही असे भासवत मागच्या दाराने सोशल मिडियाच्या माध्यमातून पेरत असतात.

मेणबत्तीच्या निर्माण होणाऱ्या उर्जेतून कोरोना मारला जाण्याची थेअरी तर भल्याभल्या शास्त्रज्ञांनाही गारद करुन सोडेल, अशीच आहे. जगभरातील जे शास्त्रज्ञ यावर संशोधन करीत असतील त्यांची केलेली ही एक मोठी थट्टाच म्हटली पाहिजे.

मोदीसाहेबांनी खरे तर असे महासोहळे करण्यापेक्षा सध्याच्या देशापुढील आव्हानांकडे लक्ष देऊन ते सोडविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला पाहिजे. आज जे डॉक्टर विविध रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णावर उपचार करीत आहेत, त्यांच्याकडे पुरेशी साधने देखील नाहीत, सुरक्षिततेसाठी घालावयाचे कपडे देखील नाहीत, ते त्यांना तातडीने पुरविण्याची आवश्यकता आहे.

लॉकडाऊनमुळे आज लाखो स्थलांतरीतांचे जीणे कवडीमोल झाले आहे त्यातून जे समाजाचे प्रश्न निर्माण झाले आहेत ते सोडविण्यासाठी सरकारने कोणते प्रयत्न केले, असा सवाल उपस्थित होतो. ज्यांचा आज देशात रोजदारीवरील कामगार, कष्टकऱ्यांचा रोजगार बुडाला आहे त्यांना रोजगार पुन्हा मिळेपर्यंत दोन वेळचे तरी अन्न मिळण्याची व्यवस्था झाली पाहिजे, यासाठी सरकारने कोणती पावले उचलली आहेत? एवढेच नव्हे तर संघटीत कामगारांना मार्च महिन्याचा पगार मिळाला असला तरी एप्रिल महिन्याचा पगार मिळेल का, अशी शंका आहे. त्यासाठी सरकारने कोणते उपाय योजले.

तबलिघ ए जमात या मुस्लिमांच्या मेळाव्याने कोरोनाची बाधा जास्त लोकांना झाली आहे, हे वास्तव नाकारता येणार नाही. या धर्मवेड्या मुस्लिमांना लक्ष्य करण्याएवजी सर्वच मुस्लि समाजाला टार्गेट केले जात आहे. सर्वच मुस्लिमांना बदनाम करण्याचे छडयंत्र रचले जात आहे आणि याला मोदी सरकारचाच पाठिंबा आहे.

मात्र हा मेळावा सरकारच्या परवानगीशिवाय होतोच कसा? सरकारच्या परवानगी शिवाय सुमारे दोन हजार लोक जमा कसे होतात? हे गुप्तचर खात्याचे अपयश नाही का? मोदी सरकार याची चौकशी करणार किंवा नाही? ज्याप्रमाणे मुस्लिमांचा मेळावा होतो त्याचधर्तीवर कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा हे एका आमदाराच्या मुलीच्या लग्नात तीन हजारांच्या जमावात उपस्थितीत राहातात.

एका राज्याचा मुख्यमंत्रीच जर अशा प्रकारे सोशल डिस्टंटिंगचा आदेश धुडकावतो, तर जनतेला विचारणार कोण? उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्रीही अशाच प्रकारे राम लल्लाच्या देवळात जाऊन घोळक्याने मूर्तीच्या स्थापनेचे पाऊल उचलतात, ते चालते. कारण ते भाजापाचे मुख्यमंत्री आहेत व हिंदूही आहेत. मुसलमानांनी केले की त्याची टीका धार्मिक पातळीवर सुरु होते.

अर्थात कोणत्याही धर्माच्या लोकांनी केलेली चूक ही चूकच आहे. त्यामुळे आपल्याला जर आपला देश प्रकाशाकडे न्यायचा असेल तर विज्ञानवादी दृष्टीकोन बाळगला पाहिजे हे सर्वात महत्वाचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेच्या कलमांनुसार देश चालला पाहिजे. गेल्या सहा वर्षात मोदींनी देशाचे मूलभूत प्रश्न सोडविण्याएवजी देशात धार्मिक प्रश्न उपस्थित करुन देशवासियांना त्यात गुंगवून ठेवण्याची मोठी किमया केली आहे.

धर्माच्या प्रश्नावर लोक सहज अनावश्यक प्रश्नाला बळी पडतात व मूळ प्रश्न विसरुन जातात. यातून राज्यकर्ते दिवस ढकलू शकतात. सध्या आपल्या देशात सुखवस्तू म्हणून ओळखले गेलेले मध्यमवर्गीय 35 कोटी एवढ्या संख्येने असलेल्या मध्यमवर्गीयांना देखील मोदींचे हे डाव ओळखता येत नाहीत व ते धार्मिक केंद्रीकरणाच्या राजकारणाला बळी पडतात.

खरे तर या मध्यमवर्गीयांचा जन्मच हा मुळी डॉ. मनमोहनसिंग यांच्या आर्थिक उदारीकरणाच्या धोरणातून झाला आहे. त्यांना जन्म देणारे धोरण हे कॉँग्रेसनेच आखले, त्यांच्या वाढीस पोषक धोरण कॉँग्रेसने आखूनही हा मध्यमवर्गीय सर्वधर्मसमभावाचा नव्हे तर हिंदुत्वाचा पुरस्कार करीत आहे, ही खेदजनक बाब ठरावी. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मात्र सकारात्मक भूमिका घेतली आहे.

काळोखात होते ते काळेबेरे, उजेडात होते ते स्वच्छ सत्य, असे सांगत लाईट बंद न करता सर्वत्र दिवे लावू लख्ख उजेड पाडा असे सांगत प्रत्येकाने किमान 101 रुपयाची देणगी मुख्यमंत्री निधीला द्या असे वास्तववादी आवाहन केले आहे.

कोरोना संपुष्टात आल्यावर देशापुढे अनेक भयंकर प्रश्न उपस्थित होणार आहेत. त्याची मेणबत्ती लावून किंवा टाळ्या वाजवून सोडवणूक होणार नाही, हे सत्य जनतेला भविष्यात पटणार आहे. मात्र त्यासाठी काही काळ जावा लागेल.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत