वर्ष कसोटीचे…

आता २०२१ साल सुरु होऊन दोन दिवस उलटले आहेत. गेले वर्ष पूर्णपणे कोरोनाच्या सावटाखालीच गेले. सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने २०२० हे साल कसोटीचे ठरले. आता सुरु झालेले २०२१ साल प्रत्येकासाठी मोठे आव्हानात्मक ठरणार आहे. गेल्या वर्षाचे कवित्व अजून काही संपलेले नाही व संपणारही नाही. कोरोनामुळे संपलेले गेले वर्ष प्रत्येकाच्या लक्षात राहिल असेच होते. कारण या वर्षाने अनेकांना होत्याचे नव्हते करुन टाकले. ज्या चीनमधून कोरोनाचा उगम झाला त्याने मात्र त्यावर झपाट्याने मात केली, निदान त्यांनी तशी माहिती तरी जगाला सांगितली. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प या नरेंद्र मोदी यांच्या दोस्ताचा पराभव झाला. त्यांनी कितीही रडीचा डाव खेळला तरी अखेरीस ट्रम्प तात्यांना पराभव स्वीकारावाच लागला. आपला देशच नव्हे तर संपूर्ण जग कोरनामुळे मंदीत गेले. मात्र आपल्याकडे कोरोनाच्या अगोदर मंदी सुरु झाली होती. मात्र कोरोनामुळे अर्थव्यवस्थेतील सत्ताधाऱ्यांचे अपयश झाकले गेले. असे असले तरीही देशातील शेअर बाजार उच्चाकांचे नवनवीन रेकॉर्ड करीत राहिला. अर्थव्यवस्था मंदीत असताना व देशात कोरोनाचा हाहाकार माजवला असताना शेअर बाजार काही काळ मंदीत गेला, मात्र नंतर कसलेही ठोस कारण नसतानाही शेअर बाजारात तेजी सुरु झाली आणि त्या तेजीने आजवरचे सर्व विक्रम मोडले.

भाजपाचा निवडणुकीतील विजयाचा वारु देशापुढील समस्याचे निवारण न करताही चौखूर उधळलेलाच राहिला. मोदींचे नशिबच चांगले असे म्हणण्याची पाळी विरोधकांवर आली आहे. देशात शंभराहून जास्त काळाची परांपरा लाभलेला व नेतृत्वहीन झालेला कॉँग्रेस पक्ष मात्र दिवसेंदिवस परभवाच्या छायेत रुतत चालला आहे. वर्ष संपताना व त्यानंतरही शेतकऱ्यांचे आंदोलन लढाऊ पध्दतीने सुरुच आहे. त्यांनी सत्ताधाऱ्यांना खऱ्या अर्थाने घाम फोडला आहे. मोदींना एवढे चॅलेंज गेल्या सहा वर्षात कोणीही दिले नसेल तेवढे शेतकऱ्यांनी नाकी नऊ आणले आहेत. आता २०२१ साली जग कसे वळण घेते ते पहावे लागेल. अमेरिकेच्या अध्यक्षपदी बायडेन यांना आणून अमेरिकन मतदारांनी आपली राजकीय परिपक्वता दाखवून दिली आहे. आता त्यापाठोपाठ जगात काय बदल होऊ घातले आहेत त्याची पायाभरणी २०२१ मध्ये निश्चितच होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दोस्त अंबानी-अदानी हे दोन्ही आपापल्या व्यवसायात फार्मात आले आहेत. दहा वर्षापूर्वी ज्या अंबानींच्या कंपनीचा मुख्य व्यवसाय पेटोकेमिकल्स होता त्यांचा आता फोकस बदलून टेलिकॉम व रिटेल झाला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज गेल्या वर्षी कर्जमुक्त कंपनी झाली. आता जिओ ची खुली भागविक्री कदाचित देशात व परदेशात करण्याची तयारी सुरु झाली आहे. अदानी समूह आता देशातील सर्वात मोठा बंदरे असलेला खासगी समूह झाला आहे तर दुसरा मोठा विमानतळ नियोजनाच्या क्षेत्रात आहे. त्याशिवाय त्यांनी आता अनेक क्षेत्रात त्यांनी यशस्वीरित्या पाय रोवले आहेत. कदाचित भविष्यात अदानी समूह देशातील दोन क्रमांकाचा होऊ शकतो.

बँकिंग उद्योगातील महत्वाची घटना म्हणजे, डी.बी.एस. बँक या परदेशी सिंगापूरस्थित बँकेने लक्ष्मी विलास बँक ताब्यात घेऊन आपले हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. गुगल, फेसबुक यांच्यावर अमेरिकेत मोठे खटले झाले. मात्र भारतात त्यांच्यावर असाच प्रकारची कारवाई होणार का, हे पहावे लागेल. गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या कालात ई कॉमर्स हे क्षेत्र झपाट्याने वाढले. आता हे क्षेत्र पुढील काळातही बहरत जाणार आहे. त्यामुळे यात आणकी कंपन्या उतरतील. ऑनलाईन रिटेल क्षेत्रही आपल्याकडे अशाच प्रकारे वाढत चालले आहे. त्यात आता टाटांचा समावेश होणार आहे, त्यामुळे यातील स्पर्धा अजून वाढेल. भारतातील नोकऱ्यांचे मार्केट कधी सुधारेल हे आत्ताच सागंता येत नाही. गेल्या वर्षी कोरोनामुळे लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या, किंवा पगारात तरी कपात झाली. आता यातील बहुतांशी लोकांच्या नोकऱ्या पुन्हा सुरु होऊ लागल्या आहेत. मात्र नवीन नोकऱ्यांची बाजारपेठ अजूनही थंडच आहे. आगामी वर्षात ती कसी वेग घेईल ते आत्ताच काही सांगता येत नाही. आपल्याकडे जे अनेक बदल झाले त्यात एक महत्वाचा नकळत झालेला बदल म्हणजे अंबानींच्या जिओने आपले दर वाढविण्यास आता सुरुवात केली आहे. आजवर लोकांना फुकट फोन देऊन व्यसन लावले व दुसरीकडे अन्य कंपन्या संपवून टाकल्य़ा.

आता रिलायन्स आपली मक्तेदारीसारखी स्थिती झाल्यावर दरात वाढ करु लागले आहे. आता चालू वर्ष अनेक उद्योगांसाठी म्हणजे पर्यटन, विमानसेवा, हॉटेल्स, करमणूक क्षेत्र यांच्यासाठी कसोटीचे ठरणार आहे. प्रामुख्याने करमणूक उद्योग कसा रिकव्हर होतो हे पहावे लागेल. सिनेमागृहे, नाट्यगृहे सुरु झाली असली तरीही लोकांच्या मनात अजूनही भीती आहे. यापेक्षा अजून तरी ओ.टी.टी. प्लॅटफार्मवरुन पाहणे लोक पसंत करीत आहेत. त्यामुळे ओटीटीसाठी क सुवर्णकाळच ठरावा. भारतीय वंशाच्या कमला हॅरिस अमेरिकेच्या उपाध्यक्षपदी नियुक्त झाल्याबद्दल त्यांचे भाजपासहित सर्व थरातील भारतीयांनी स्वागत केले मात्र विदेशात जन्मलेल्या व भारतात स्थायिक झालेल्या सोनिया गांधींना काही भाजपावाले स्वीकारायला तयार होत नाहीत. हा मनाचा कद्रुपणाचा म्हणावा लागेल. चालू वर्ष हे सत्ताधाऱ्यांसाठी सर्वात कठीण जामार आहे. कारण पश्चिम बंगाल, आसाम, तामीळनाडू, केरळ या राज्यातील विधानसभेच्या निवडणुका आहेत. तसेच अर्थव्यवस्थेत सुधारणा करावी लागणार आहे. जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करावी लागणार आहेत. रामजन्मभूमी मंदिराचे आश्वासन पूर्ण झाले असले तरी अजून अनेक आश्वासने अधांतरीतच आहेत. ती पूर्ण करताना भाजपाची कसोटी लागेल. एकीकडे भाजपाच्या विरोधात विरोधी पक्षांची मोट काही मजबुतीने उभी राहिलेली दिसत नाही. त्याचा फायदा भाजपाला मिळत आहे. पूर्वी असाच फायदा कॉँग्रेसला मिळे. राजकारणाचे फासे आता पूर्णपणे बदलले आहेत. देश स्वातंत्र्यानंतर डाव्या विचारांच्या दिशेने झुकलेला होता. त्यानंतर लोकशाही जिवंत ठेवत आर्थिक उदारीकरण आपण स्वीकारले. आता तर देश मोदींच्या नेतृत्वाखाली पूर्णपणे उजव्या विचारसारणीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. ही वाटचाल सुरुळीत राहिल की त्यात अडथळे येणार ते सध्याचे वर्षच ठरवेल.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत