Bhai Jayant Patil

लोकनेता

शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस, सहकारमहर्षि, गरीबांना शिक्षण मिळावे यासाठी शिक्षणसंस्था काढणारे व यशस्वी उद्योजक आमदार भाई जयंत पाटील यांचा आज ६१वा वाढदिवस मोठ्या उत्साहाने कार्यकर्ते साजरा करीत आहेत. या अभिष्टचिंतन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूरचे माननीय छत्रपती शाहू महाराज उपस्थित राहाणार आहेत.

संत तुकारामांपासून छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची बहुजन समाजाची विचारधारा शेकापच्या नेत्यांनी आजवर आपल्या अंगी जोपासली आहे. आमदार जयंतभाई पाटील हे त्यातील एक बिनीचे शिलेदार आहेत.

राज्यातील एक पुरोगामी घराणे म्हणून पेझारीच्या पाटील कुटुंबाला सर्व जनता ओळखते. या घराण्याचा याचा पुरोगामी वारसा भाईंनी त्यांच्या वडिलांकडून घेतला आणि लहान वयातच लाल बावटा खांद्यावर घेतला तो आजपर्यंत.

गेल्या चाळीस वर्षात रायगड जिल्ह्यात शेकाप एक नवी ताकद म्हणून उभा राहिला. खरे तर गेल्या दशकात डावी पक्षांची चळवळ देशात नव्हे तर जगात क्षीण झाली. असे असले तरी रायगडात मात्र शेकाप आपला बालेकिल्ला शाबूत ठेवून आहे. यामागच्या यशाचे सर्व श्रेय जयंतभाईंना जाते.

शेकापच्या या रायगड पॅटर्नचा अभ्यास खरे तर डाव्या चळवळीने करुन त्यातून बोध घ्यायला पाहिजे. देशातील डाव्या चळवळीने आपला पोथीनिष्ठपणा कधीच सोडला नाही आणि त्यामुळे त्यांची वाढ खुंटली. उलट शेकापने आपल्या डाव्या विचारांशी व बहुजनांशी असलेल्या आपल्या नात्याशी कधीही तडजोड न करता पोथीनिष्ठपणा जोपासला नाही. यातूनच त्यांची वाढ झाली. यातून डाव्या पक्षांनी बोध घेण्याची हीच योग्य वेळ आहे.

समाजवाद म्हणजे गरीबीचे वाटप नव्हे तर समृध्दी आणण्याचा तो एक मार्ग आहे, असे भाई नेहमी सांगतात. भाईंनी कष्टाच्या जीवावर स्वतच्या घरात समृध्दी आणली व त्यातून पक्षालाही उभारी दिली. एक उद्योजक डाव्या विचाराचा असू शकतो काय, असाही प्रश्न डाव्या विचारसरणीच्या मंडळींना पडतो. विदेशात आपल्याला अनेक उद्योगपती डाव्या विचारांचे किंवा डावीकडे झुकलेले दिसतात.

भारतात मात्र केवळ भाईच उद्योगपती असूनही डाव्या विचारांचे दिसतात. (आणखी एक अपवाद म्हणजे इन्फोसिसचे सर्वेसर्वा नारायणमूर्ती हे देखील कम्युनिस्ट विचारसारणीने भारलेले होते.) कष्टाने-सचोटीने उद्योग करण्यात चुकीचे काही नाही, कार्ल मार्क्सने उद्योग करु नकात असे कुठेही लिहून ठेवलेले नाही. उलट या देशात जर डाव्या विचारांचे सरकार यावे असे वाटत असेल तर समाजातील प्रत्येक घटक म्हणजे उद्योगपतींपासून ते तळागाळातला कष्टकरी तुमच्याशी बांधला गेला पाहिजे.

म्हणूनच रायगड जिल्ह्यातील व्यापारी असो, लहान उद्योजक असो वा कष्टकरी, शेतकरी असो त्यांना शेकापच्या लाल झेंड्याखाली आणण्याचे काम भाईंनी केले. रायगडातील हा प्रयोग यशस्वी झाल्यावर भाईंनी संपूर्ण राज्यात हा प्रयोग यशस्वी व्हावा व डाव्यांची ताकद वाढावी यासाठी गेल्या काही वर्षात प्रयत्न सुरु केले आहेत. त्याला भविष्यात यश येईलच.

आपली चळवळ मजबूत करायची असेल तर आपल्या हाती वृतपत्राचे अस्त्र पाहिजे, हे भाईंनी ओळखले होते. यातूनच त्यांनी कृषीवल या साप्ताहिकाचे रुपांतर छोट्या दैनिकात त्यानंतर मोठ्या स्वरुपातील दैनिकात केले. भाईंनी देखील आपल्या बुध्दीमत्तेच्या जीवावर पैसा कमावला.

मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया ही बोटसेवा सुरु केल्यास अलिबाग मुंबईच्या जवळ येईल व या भागाचा कायापालट होईल हे भाईंच्या चाणाक्ष बुध्दीने हेरले. त्याकाळी त्यांनी मांडवा-गेट वे ही बोट सुरु केली त्यावेळी अनेकांनी त्यांना मुर्खात काढले. परंतु ज्यावेळी नंतर ही सेवा यशस्वी झाली त्यावेळी त्यांच्यावर टीका करणारे मुर्ख ठरले. त्यानंतर जयंतभाईंनी कधी मागे वळून पाहिले नाही.

उद्योगाचे एक एक नवनवीन शिखर पादाक्रांत केले. केवळ देशात नाही तर आपल्या उद्योजकतेची पताका विदेशातही फडकविली. अर्थात हे करीत असताना राजकारणाशी आपला उद्योग कधीच जोडला नाही. अनेक राजकारणी हे राजकारणात यशस्वी झाल्यावर उद्योजक बनतात. भाईंचे मात्र उलटे आहे. त्यांनी राजकारणातून कमविलेला पैसा राजकारणात घातला. त्यामुळेच अनेक राजकारणी भाईंना मान देतात. त्यांच्याविषयी एक वेगळाच आदर यातून निर्माण झाला आहे.

सहकार क्षेत्राबाबतही असेच झाले. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक त्यांच्या ताब्यात आली त्यावेळी डबघाईला आली होती. परंतु सहकार म्हणजे स्वाहाकार नाही हे तत्व अंमलात आणत भाईंनी ही बँक यशाच्या नव्या शिखरावर पोहोचविली. आज ही बँक संपूर्ण राज्यातील जिल्हा सहकारी बँकेत प्रथम क्रमांकाचा मान गेली कित्येक वर्षे मिळवित आहे.

भाईंनी मात्र आपल्या पी.एन.पी. एज्युकेशन ही संस्था गरीब मुलांना चांगल्या दर्ज्याचे शिक्षण मिळावे यासाठी स्थापन केली आहे. यात संस्थेत खर्‍या अर्थाने गरीबांना परवडेल अशा खर्चात शिक्षण दिले जाते. भाईं हे नेहमी तळागाळातल्यांचा विचार करतात.

साधी राहाणी व उच्च विचारसरणी त्यांनी नेहमीच अंगिकारली. आपल्या घराण्याच्या असलेल्या उज्वल वारशावर कधी ओरखडा येऊ दिला नाही. भाईंनी आपल्या सार्वजनिक जिवनात यशही पाहिले व पराभवही अनुभवले. खर्‍या अर्थाने ते लोकनेता ठरले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत