बायडेन पर्व सुरु

अमेरिकेचे ४६ वे अध्यक्ष म्हणून जो बायडेन यांनी शपथ घेतल्याने अमेरिका व पर्यायाने जगावर असलेले ट्रम्प नावाचे संकट संपले आहे. गेले चार वर्षे अमेरिकेला जो ट्रम्पशाहीचा विळखा पडलेला होता त्यातून मुक्तता झाली. ट्रम्प यांना अखेरीस आपला पराभव मान्य करावा लागला. मात्र जाताना मी पुन्हा येईन असा जयघोष ट्रम्प यांनी केला आहे. आपल्याकडेही असा जयघोष करणाऱ्यांची काय स्थिती झाली हे आपण पाहतोच आहोत. असो. जगातील एक महत्वाची आर्थिक ताकद असलेल्या अमेरिकेत लोकशाही मार्गाने अखेर अपेक्षीत सत्तांतर झालेच. असे असले तरीही विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला पराभव मान्य करायला महिना काढला. त्यानंतर अलिकडेच अमेरिकेच्या संसदगृहावर ट्रम्प समर्थकांनी केलेला हल्ला पाहता अमेरिकन लोकशाहीची सर्वत्र छी थू झाली. त्यावरुन ट्रम्प महाशय किती अपरिपक्व नेते होते ते दिसते. अशा या नेत्याच्या मागे आपले पंतप्रधान मोदी किती आहारी गेले होते हे देखील पहायला मिळाले होते. अमेरिकेच्या इतिहासात ही निवडणूक बऱ्याच दृष्टीने पाहता एतिहासिक ठरली आणि सत्तांतरही एतिहासिक ठरले. यंदाच्या निकालातील महत्वाची घटना म्हणजे भारतीय वंशांच्या व डाव्या विचारांकडे झुकलेल्या कमला हॅरिस यांची उपराष्ट्राध्यपदी निवड झाली. अमेरिकेतील या पदावर विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या भारतीय वंशाच्या महिला ठरल्या आहेत.

भविष्यात भारत अमेरिका संबंध अधिक दृढ होण्यासाठी हॅरिस यांची मोठी मदत होईल यात काही शंका नाही. डेमॉक्रॅटिक पक्षाचे उमेदवार असलेले जो बायडेन यांनी आपल्या संयमी स्वभावाने ही निवडणूक अखेर जिंकलीच व आता त्यांनी ट्रम्प यांचे डझनभर निर्णय रद्द करण्याची यादी तयार केली आहे.  ट्रम्प यांनी विविध प्रश्नी जो अतिरेक केला होता त्याचा अमेरिकनांना विट आला होता असेच हा पराभव सांगतो. एकीकडे उग्र, तोंडाळ व आक्रस्तळपणे केलेला ट्रम्प यांची राजवट तर दुसरीकडे बायडेन यांनी शांत परंतु निश्चयाने अमेरिकन लोकांचे प्रश्न मांडून त्याचा केलेला उहापोह जनतेला भावला.. बायडेन हे बराक ओबामा यांच्या काळात उपाध्यक्ष होते. त्यामुळे त्यांचा प्रशासकीय कामातील अनुभव मोठा आहे. उपाध्यक्ष असताना त्यांनी आर्थिक मंदीतून सावरण्यासाठी केलेले प्रयत्न व स्वस्त वैद्यकीय उपचार देण्यासाठी केलेले उपाय यामुळे प्रत्येक अमेरिकनांच्या मनात मोठी आदराची भावना आहे. माजी अध्यक्ष ट्रम्प यांनी अमेरिकेतील मोठ्या संख्येने असलेली भारतीय वंशांच्या नागरिकांची मते खेचण्यासाठी मोदी यांना सोबत घेऊन भारतात व अमेरिकेत मोठे कार्यक्रम केले होते. मोदी यांनीही या उत्साहाच्या भरात ट्रम्प यांचा थेट प्रचारही केला होता. खरे तर सा प्रकारचा प्रचार करणे अपेक्षीत नाही किंवा ते राजशिष्टाचारातही बसत नाही.

परंतु त्यावर मात करण्यासाठी बायडेन यांनी भारतीय वंशाच्या कमला यांना उपाध्याक्षपदाची जागा दिली होती. त्यामुळे मोदी यांच्यामागे शंभर टक्के भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक आहेत असे नव्हे हे सिद्द झाले आहे. आज कोरोनाने अमेरिकेत धुमाकूळ घातलेला असताना पुन्हा नव्याने अमेरिका उभी करावी लागणार आहे. त्यासाठी बायडेन यांच्यासारखे जाणते व संयमी नेतृत्व अमेरिकेला लागेल हे जनतेने ओळखले. माजी राष्ट्राध्यक्ष ओबामा यांच्या सोबतीने त्यांनी काम केलेले असल्याने त्यांना जनतेच्या हिताच्या दृष्टीने कशी पावले टाकता येतील याची नक्की जाण आहे. तर कमला हॅरिस यांच्या आई डॉ. श्यामला गोपालन या भारतीय तामीळ तर वडिल डॉ. डोनाल्ड हॅरिस हे जमैकाचे. त्यांची आई डॉक्टर तर वडिल अर्थशास्त्राचे अभ्यासक. त्यांची अमेरिकेत मैत्री झाली व त्यांनी लग्न केले. कमला यांचे भारतीयत्वाचे नाते आता भविष्यात भारताच्या कसे फायदेशीर ठरते ते पहावे लागेल. कोरोनाच्या काळात ट्रम्प यांनी घेतलेली धोरणे व भूमिका अमेरिकन जनतेस काही पसंत पडली नव्हती. त्यांनी जनतेला काहीसे वाऱ्यावर सोडल्यासारखेच केले होते. त्यातच कोरोनाची बाधा होणे हा देवाचा आशिर्वाद असे वक्तव्य करुन ट्रम्प यांनी आपल्यावर वाद ओढावून घेतला होता.

त्याचबरोबर कृष्णवर्णिय जॉर्ज फ्लॉइड याचा झालेला पोलिस कोठडीत झालेल्या मृत्यूनंतर संपूर्ण अमेरिकेभर तीव्र पडसाद उमटले होते. त्यानंतर ट्रम्प यांनी दिलेली टोकाची प्रतिक्रिया जनतेला काही भावली नव्हती. मेक्सिकोच्या सीमेवर भिंत बांधण्याचा घेतलेला निर्णय व मेस्किको सीमा पार करणाऱ्यां मुलांना त्यांच्या पालकांपासून वेगळे ठेवण्याचा घेतलेला निर्णयही वादग्रस्त ठरला होता. अमेरिकेत बदल होणार याची चाहून गेले वर्षभर लागली होतीच. कदाचित ट्रम्प यांनाही त्याची माहिती असावी. कारण त्यांनी आपण न्यायालयात आव्हान देऊ, अध्यक्षपद सोडणार नाही अशी टोकाची वक्तव्ये केली होती. त्यामुळे अमेरिकन लोकशाहीचा झालेला अपमान जनतेला काही पसंत नव्हता. या बदलांनंतर भारत-अमेरिका संबंध कसे राहातील हा कळीचा मुद्दा राहिला आहे. एक बाब लक्षात घेतली पाहिजे की अमेरिकेत कोणीही म्हणजे डेमॉक्रॉटीक असो किंवा रिपब्लिक पक्षाचा अध्यक्ष सत्तेवर आला तरी ते प्रथम अमेरिकेचे आर्थिक हितसंबंध कसे जपता येईल याचा विचार प्रथम करतात. आता भारताची अमेरिकेला गरज तर आहेच तसेच अमेरिकेलाही तेवढीच मदत अपेक्षीत आहे. भारतीय वंशांच्या नागरिकांची असलेली मोठी संख्या व भारताने आता स्वीकारलेले मुक्त आर्थिक धोरण अमेरिकन भांडवलशाहीला पोषक आहे. त्यामुळे ट्रम्प जाओ किंवा बायडेन येवो उभय देशांची मैत्री ही वाढतच जाणार आहे. 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत