BJP

वाढता धोका: कोरोनाचा व विरोधकांचा

देशातील कोरोनाचा संसर्ग गेल्या काही दिवसात झपाट्याने वाढत चालला असून तो सर्वात धोकादायक वाटतो. आपल्याकडे रुग्णसंख्येचा ग्राफ दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. गेले काही दिवस देशात कोरोनाचे रुग्ण दररोज किमान सहा हजाराने वाढत चालले आहेत. अशा परिस्थितीत लॉकडाऊन काय कामाचे असा प्रश्न विचारला जातो.

परंतु जर लॉकडाऊन केले नसते तर ही संख्या भीषण असती. जागतिक स्तरावरील एका संस्थेने केवळ एकट्या मुंबईत मेच्या मध्यास किमान 16 लाख रुग्ण असतील असा अंदाज व्यक्त केला होता. परंतु सुदैवाने मुंबईत अजूनही रुग्ण संख्या वाढत असली तरीही काही हजारातच आहे.

आपल्याकडील चौथे लॉकडाऊन आता संपायला जेमतेम आठवडा शिल्लक आहे. त्यानंतर सरकार कोणता निर्णय घेणार याची चर्चा सुरु झाली आहे. लोकांचा जीव घरात कामाशिवाय बसून घुसमटू लागला आहे. तसेच अस्वस्थ असलेला स्थलांतरीत मजूर मिळेल ते वाहन किंवा चालत आपल्या गावी पोहोचत आहे.

आता आपण चौथ्या लॉकडाऊननंतर 67 दिवस पूर्ण करु. मात्र हे लॉकडाऊन पुरेसे नाही असेच चित्र आहे. आपल्याला काही सेवा सुरु करीत असताना जूनमध्येही लॉकडाऊन सुरुच ठेवावे लागणार आहे. मात्र अत्यावश्यक कामाशिवाय लोकांनी प्रवास केल्यास कोरोनाचा धोका वाढत जाणार आहे. याचे उत्तम उदाहरण कोकणातील देता येईल.

रायगड जिल्ह्यातील पनवेल व उरण भाग वगळता संपूर्ण जिल्ह्यात कोरोनाच्या अतिशय किरकोळ संख्यने रुग्ण होते. मात्र ज्या प्रकारे चौथ्या लॉकडाऊनमध्ये कोकणातील वर्दळ वाढू लागली, मुंबईतून लोक आपल्या गावाकडे परतू लागले तसे कोरोनाचे रुग्ण रायगडात वाढू लागले आहेत. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातही अशीच परिस्थिती आहे.

दरवर्षी एप्रल- मे महिन्यात कोकणात आपल्या गावी चाकरमणी येतात. आंबा, फणसाचा स्वाद घेऊन परत मुंबईला जातात. कोकणाशी असलेली त्याची नाळ यामुळे घट्ट होते. मात्र यावर्षी सध्याच्या कोरोनाची लागण वाढत असताना चाकरमन्यांनी मुंबईलाच राहणे पसंत केले असते तर बरे झाले असते. आता त्यामुळे गावागावात कोरोनाचा प्रवेश सुकर झाला आहे.

अनेक गावात येणाऱ्यांसाठी क्वारंटाईनची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र 14 दिवस तेथे राहाण्याचे बंधन पाळलेच जाते असे नाही. अशा स्थितीत हजारातून एकाला जरी कोरोनाची लागण झालेली असेल तर तो रोग पसरवितो व त्याचा परिणाम संपूर्ण गावावर होतो. त्यामुळे नवीन लॉकडाऊन सुरु करताना आवश्यकता आहे त्यांच्याच प्रवासाला मान्यता दिली पाहिजे.

तसेच आता काही प्रमाणात रेल्वे सुरु करण्यात येणार आहेत. सध्या स्थालांतरीत मजुरांना घरी पोहोचविण्यासाठी ज्या रेल्वे सुरु केल्या आहेत त्याचा नाईलाजच आहे. मात्र नियमीत प्रवासासाठी रेल्वे सुरु केल्यास कोरोनाचा प्रसार वाढण्याचा धोका आहे. त्याचबरोबर विमान वाहतूक काही महत्वाच्या शहरांसाठी सुरु करण्यात येणार आहे.

कितीही खबरदारी घेतली तरी या सर्व सुविधांमुळे कोरोनाच्या प्रसारास निश्चितच वाव मिळणार आहे. त्यातच मुख्यमंत्र्यांनी मुंबईत अत्यावश्यक सेवांसाठी लोकल गाड्या सुरु करण्याची मागणी केली आहे. ती मागणी मान्य झाल्यास घरी बसलेला प्रत्येक मुंबईकर लोकल पकडायला धावणार आहे. त्यातून कोरोना वाढण्याची शक्यता अधिक आहे.

अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी आता हालचाल करण्याची आवश्यकता आहे हे आपण मान्य केले तरी माणूस जगला तर अर्थव्यवस्था तरणार आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. निदान रेड झोनमधील हालचाल रोखली गेली पाहिजे. आज मुंबईत धारावीत भयानक परिस्थिती आहे. सरकारपुढे कोरोनाच्या रुग्णांना क्वॉरंटाईन कुठे करुन ठेवायचे असा प्रश्न उभा राहिला आहे. त्यासाठी विविध जागा ताब्यात घेतल्या जात आहेत.

सध्या आपण केवळ कोरोना व त्यासंबंधीत रुग्ण यावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे अन्य रोग झालेले किंवा पूर्वीपासून विविध रोग असलेल्यांवर उपचार होत नाहीत, अशी चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अन्य कोणत्याही रुग्णसेवा थांबता कामा नयेत याचीही खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. काही रुग्ण आरोग्यसेवा उपलब्ध न झाल्याने मरण पावल्याच्या दुर्दैवी घटना मुंबईत घडल्या आहेत.

सरकारने सध्या खासगी रुग्णालयातील 80 टक्के खाटा आपल्या ताब्यात घेतल्या आहेत. मात्र त्यामुळे अन्य रुग्णांकडे दुर्लक्ष होता कामा नये हे पाहणे अत्यावश्यक आहे. सध्याची स्थिती अभूतपूर्व आहे, त्यावर मात करावयाची असेल तर सध्याची रुग्णसेवा कायम राखत नवीन बेडसची व्यवस्था करावी लागणार आहे.

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वांनी एकत्र येऊन कोरोनाविरुध्द लढा द्यावा असे आवाहन करतात तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे लोक महाराष्ट्रात सरकारविरोधी घोषणा देत आहेत. एवढेच काय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मेकअप करुन आंदोलनाला जाण्याच्या तयारीत असतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

देशाला लाज वाटावी अशी ही घटना आहे. सत्ता गेल्यामुळे भाजपा किती हवालदील झाला आहे हे यावरुन दिसते. सध्याच्या काळात पक्षविरहीत जनसेवा करायची की राजकारण करायचे याचेही भान पाच वर्षे सत्ता उपभोगलेल्यांना नाही.

भाजपाच्या या आंदोलनाला जनतेने फारशी साथ दिली नाही. सोशल मिडियात तर त्यांची बऱ्यापैकी खिल्ली उडविली गेली, हे बरेच झाले. आता तरी यावरुन बोध घ्यावा व फडणवीस व त्यांच्या साथीदारांनी सावध व्हावे. सध्याच्या कठीण काळात सरकारला सहकार्य करण्यातच शहाणपणा आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत