रणधुमाळी व त्यानंतर….

ग्रामपंचायती निवडणुकांची रणधुमाळी थांबली आहे. आता विजय-पराजय हे विसरुन जनतेने दिलेल्या कौलाचा सन्मान राखत जनतेची कामे करण्याची वेळ आता आली आहे. राज्यातील १४ हजार ग्रामपंचायतींचा निकाल पाहता जनतेने सत्ताधारी महाविकास आघाडीला कौल दिला आहे. तसेच अलिबाग, पेणसह रायगड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्षाने ग्रामपंचायत निवडणुकीत जोरदार मुसंडी मारल्याने भाजपाला रोखण्याचे काम शेकापने आपल्या हिंमतीवर मित्रपक्षांच्या सोबतीने केले आहे. त्याचबरोबरीने त्यांनी कॉँग्रेस, राष्ट्रवादीला आपल्यासोबत घेत भाजपाचा सामना केल्याने जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुळात भाजपाचे सर्व कार्यकर्ते हे अन्य पक्षातून उसनवारीने घेतलेले आहेत. राज्यात सत्ता असल्याने ते त्यांच्याकडे गेले होते. परंतु आता ती सत्ता गेल्यावर हे कार्यकर्ते पुन्हा आपल्या मूळ पक्षाकडे परतू लागल्याचे चित्र दिसत आहे. अलिबाग, पेण या तालुक्यातील आपले वर्चस्व शेकापने पुन्हा एकदा अधोरेखीत केले असून जिल्ह्यात शेकापने ग्रामपंचायतीत आपला ठसा उमटविल्याने ग्रामीण भागातील पक्षाची पक्कड अजून कायम असल्याचे स्पष्ट झाले. शेकाप हा केडरबेस पक्ष असून त्याची प्रचिती वेळोवेळी आली आहे. मात्र असे असले तरी शेकापने पराभवही पाहिला आहे. मात्र त्यातूनही जनतेचा कल स्वीकारत पुन्हा जनतेत काम करण्यास सुरुवात केली यातून कालांतराने शेकापचा जनाधार वाढत गेला आहे. विधानसभा निवडणुकीत शेकापला पराभवाने दोन पावले मागे जावे लागले होते त्यामुळे त्यांचे विरोधक खूष होते, त्यांची अशी समजूत झाली की, शेकाप आता संपला. परंतु शेकपाने आपले वर्चस्व पुन्हा एकदा दाखवून दिल्याने शेकापचा लाल बावटा व रायगड जिल्हा हे समिकरण ठरलेलेच आहे हे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतरची ही मोठ्या संख्येने ग्रामपंचायतींची झालेली पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे महाविकास आघाडीची परीक्षा त्यानिमित्ताने होत होती. परंतु या परीक्षेत महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्ष आपल्या भागात आपले वर्चस्व कायम टिकवून आहेत असेच दिसते. अर्थात ही निवडणुकीत महाविकास आघाडीची सरशी झालेली असली तरीही ही निवडणूक या तीनही पक्षांनी काही एकत्रीत लढविली नव्हती. मात्र जास्तीत जास्त प्रमाणात या तीन पक्षांत संघर्ष होणार नाही याची दखल घेतली होती. अनेक ठिकाणी परस्परात मैत्रीपूर्ण लढती झाल्या होत्या. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यंच्या खानापूर या गावात तर भाजपाने कॉँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर आघाडी केली होती. मात्र तेथे भाजपाला काही यश मिळाले नाही. उलट चंद्रकांत पाटील यांनी आपल्याच गावी जनतेने सपाटून मार दिला आहे. नगरमध्ये विखे पाटलांनही आपल्या गावातच पराभव पत्करावा लागला आहे. एकूणच पाहता विखे भाजपात आल्यापासून त्यांची अधोगतीच सुरु झाल्याचे दिसते. तशाच प्रकारचा फटका भाजपाचे नारायण राणे यांनाही मिळाला आहे. तळ कोकणात केवळ राणेंचीच सत्ता हे समिकरण आता पूर्णपणे बदलले असून केवळ मालवणमधील गड त्यांना राखता आला आहे. खुद्द त्यांच्या गावात त्यांना पराभव चाखावा लागला आहे. त्यामुळे तळ कोकणातील राणेंची पकड आता पूर्वीसारखी राहिलेली नाही, हेच या निवडणुका सांगतात. मात्र कोकणात नगण्य असलेल्या भाजपाला राणेंच्या माध्यमातून शिरकाव मिळाला आहे, त्यामुळे भाजपाला राणेंचे कौतुक वाटते. परंतु या जागा भाजपाच्या नाहीत तर राणेंच्या आहेत हे त्यांनी विसरु नये. महाविकास आघाडीने या निवडणुका एकत्रित लढविल्या नसल्या तरी त्यांची बेरीज केल्यास त्यांची निश्चितच सरशी झाल्याचे दिसते. त्या तुलनेत भाजपाची मात्र आजवर असलेली गेल्या पाच वर्षातील पक्कड आता ढिली होत असल्याचे जाणवत आहे. भाजपाने सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकत २८५७ ठिकाणी विजय मिळविला. तर शिवसेना २६९४ ग्रामपंचायती, राष्ट्रवादी २६५०, कॉंग्रेस १८७४ ग्रामपंचायती मिळविल्या आहेत. मनसेने ३६ ग्रामपंचायती पटकाविल्या आहेत. विवध पक्षांना ग्रामीण भागातील पकड निश्चित करण्यासाठी ग्रामपंचायती निवडणूक हा एक महत्वाच घटक ठरतो. आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकूण मिळून नऊ हजारांच्या वर जागा पटकाविल्या आहेत. अनेकदा राज्यात कोण सत्तेवर आहे त्याचा प्रभाव ग्रामपंचायतींच्या निवडणुकांवर निश्चितच पडतो. केवळ हाच घटक नव्हे तर या निवडणुकीला अनेक कंगोरे असतात. त्यात नातीगोती-जातींची समिकरणे, ग्रामीण भागातील मैत्री, वैर, घरगुती कारणे,  अशा अनेक घटकांचा समावेश असतो. त्याचबरोबर अलिकडच्या काळात पैसा देखील महत्वाचा घटक ठरलेला आहे. असे असले तरी काही गावे ही ठराविक पक्षाची बांधिलकी ठेऊन वर्षानुवर्षे असतात. उदाहरणार्थ सासवणे या गावात ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून शेकापचीच सत्ता आहे. अशा प्रकारे काही गावे ही त्या पक्षाशी वैचारिकदृट्या बांधलेली असतात. तेथे पैसा, नाती, जात, धर्म याचे कुठलेही बंधन आड येत नाही. तेथे केवळ पक्षाला व त्या पक्षाच्या उमेदवाराला पाहूनच मते दिली जातात. आपल्याकडील निवडणुकीची जी अनेक वैशिष्ट्ये सांगावी लागतील त्यात हे फार महत्वाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. हे केवळ एक शेकापचे उदाहरण झाले, परंतु अशी काही गावे काही ठराविक पक्षाला किंवा काही ठिकाणी नेत्यांना वाहिलेली असतात. काही गावात पक्षनिष्ठेलाच महत्व दिले जाते. ग्रामपंचायतींच्या निवडणुका या पक्षाच्या चिन्हांवर लढविल्या जात नाहीत. त्यामुळे तेथे उमेदवार हा व्यक्ती म्हणून महत्वाचा घटक ठरतो. तो कोणत्या पक्षाशी बांधिल आहे त्यावर त्याची मते ठरतात. गेल्या काही वर्षात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतही लाखो नव्हे तर करोडो रुपयांच्या पैशाचा धूर उडू लागला. ग्रामीण भागात आलेली श्रीमंती व सत्तासंघर्ष ही त्यामागीच प्रमुख कारणे होती. त्यातच यापूर्वीच्या सरकारने सरपंचपदाचे आरक्षण अगोदर जाहीर करण्याची प्रथा पाडल्याने सत्तासंघर्ष तीव्र व्हायचा. जातींची समिकरणे महत्वाची ठरु लागली. त्यातूनच पैशाचा पाऊस पाडला जाऊ लागला. मात्र यावेळी महाविकास आघाडीच्या सरकारने हे बंद करुन सरपंचपदाचे आरक्षण नंतर जाहीर करण्याचे ठरविले आहे. गेल्या वेळच्या या निर्णयामुळे भाजपाला मोठा फायदा झाला होता, खरे तर त्याच जोरावर भाजपाने अनेक ग्रामपंचायतींवर आपला झेंडा फडकाविला होता. आता लवकरच आरक्षण जाहीर करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या निवडणुकींमुळे महाआघाडीचे सरकार आणखी स्थिर होण्यासाठी फार महत्वाचे पाऊल पडेल. भाजपाला आता पुन्हा लगेचच राज्यात सत्तेत येण्याचे स्वप्न पाहणे शक्य होईल असे काही वाटत  नाही. त्यातील अनेक दिग्गजांना यावेळी त्यांच्याच गावातील जनतेनेच झिडकारले आहे. यावरुन त्यांच्यावर जनता किती नाराज आहे हेच दिसते. या निकालांच्या निमित्ताने महाविकास आघाडीचे सरकार आता चांगलेच स्थिरावेल असे चित्र दिसते आहे. ग्रामपातळीवरील निवडणुकीची रणधुमाळी संपल्यावर आता सर्वांनीच गावच्या विकासाच्या दृष्टीने पावले टाकणे गरजेचे ठरले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत